पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सावधानता बाळगावी : मुफ्ती   

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी नेटवर्कच्या विरोधात सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली असून, केंद्राने सावधगिरीने पावले टाकली पाहिजे, जेणेकरून निष्पाप नागरिकांना याचे परिणाम भोगावे लागणार नाहीत, असे मत पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी समाज माध्यमाद्वारे व्यक्त केले. 
 
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करताना निष्पाप नागरिकांना, विशेषत: दहशतवादाला विरोध करणार्‍यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, याकडेही सरकारने लक्ष दिले पाहिजेे. यामध्ये निरपराध नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये यासाठी अधिकार्‍यांना सूचना द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने सुरू केलेल्या कारवाईत हजारो नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यात सामान्य काश्मिरी आहेत. यामध्ये दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली जात आहेत, असे मुफ्ती यांनी नमूद केले.

सरकारने दहशतवादाशी निर्णायक लढा द्यावा : अब्दुल्ला

केंद्र सरकारने दहशतवादाच्या मुळाशी जाऊन निर्णायक लढा दिला पाहिजे, असे मत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे. ओमर अब्दुल्ला म्हणाले, काश्मीरमधील जनतेनेदहशतवाद आणि निष्पाप नागरिकांच्या हत्येविरोधात उघडपणे समोर येऊन याच तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी हे मुक्तपणे आणि उत्स्फूर्तपणे केले आहे. या समर्थनाचा आणखी विस्तार करण्याची आणि येथील नागरिकांना कोणत्याही चुकीच्या कृती पासून दूर नेण्याची हीच वेळ आहे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, त्यांच्यावर दयामाया दाखवू नये. पण यामध्ये निरपराधांना इजा होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. दहशतवाद आणि त्याच्या स्रोतांविरुद्ध तडजोड न करता लढण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले.
 

Related Articles